कमी-जास्त पत्रक (क.जा.प.)
शेतजमिनीच्या सर्व्हे नंबर/गट नंबरच्या आकार व क्षेत्रामध्ये काही कारणांस्तव बदल झाल्यास गावच्या आकारबंद (गाव नमुना नंबर एक) मध्ये बदल करण्यासाठी जो अभिलेख तयार केला जातो त्यास कमी-जास्त पत्रक (क.जा.प.) म्हणतात.
गावातील शेतजमिनी, रस्ते, नाले, ओढे, स्मशानभूमी, वनक्षेत्र, भूसंपादन इत्यादी विविध कारणांमुळे जमिनीच्या क्षेत्रांमध्ये अमुलाग्र बदल होत असतो. अशावेळी शेत जमिनीचे मूळ क्षेत्र बदलल्यामुळे जमिनीच्या मूळ रेकॉर्डमध्ये, मोजणी खात्याकडून एक गोषवारा आणि रेखाचित्र जोडून कमी-जास्त पत्रक नावाचे तयार केले जाणारे विवरणपत्र म्हणजे क.जा.प.
साधारणपणे खालील प्रकरणी कमी-जास्त पत्रक तयार करावे लागते.
१. मोजणीवेळी झालेला दोष अगर क्षेत्र व आकार कायम करताना आढळून आलेली अंकगणितीय चूक दुरुस्त करतांना, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १०६ अन्वये काढलेल्या दुरुस्ती आदेशामुळे.
२. बिन आकारी वहिवाटीखाली नसलेली पडीत जमीन लागवडीसाठी देणे कामी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम २० (१) अन्वये पारित केलेल्या आदेशामुळे.
३. आकारी अगर बिन आकारी जमीन अगर जमीनीचा भाग सार्वजनिक उपयोगाच्या कामासाठी देतांना महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम २२ अन्वये काढलेल्या आदेशामुळे.
४. शेतीच्या उपयोगात असलेली जमीन, बिगरशेती कारणासाठी वापरण्यासाठी, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम ४४ अन्वये दिलेल्या परवानगी आदेशामुळे.
५. शेती जमीनीचा अनाधिकृतरित्या होणारा बिगरशेतीकडील वापर नियमित करणे कामी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम ४५ अन्वये काढलेल्या आदेशामुळे.
६. मळईची जमीन कब्जेहक्काने लागवडीसाठी दिल्याबाबत, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम ६५ अन्वये काढलेल्या आदेशामुळे.
७. पुरामुळे वाहुन गेलेली जमीन संबंधित भूमापन क्रमांकातून कमी करुन वाहुन गेलेल्या क्षेत्राचा आकार कमी करणेबाबत, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम ६६ अन्वये काढलेल्या आदेशामुळे.
८. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम ८६ अन्वये, नवीन स्वतंत्र भूमापन क्रमांक निर्माण करण्याबाबत दिलेल्या आदेशामुळे.
९. सार्वजनिक कामासाठी भूमीसंपादन कायदा अन्वये भूमी संपादन करुन अवार्ड स्टेटमेंटसह प्रकरण भूमि अभिलेख दुरुस्तीस प्राप्त झाल्यामुळे.
१०. महाराष्ट्र जमीन महसूल ( महसूली भूमापन आणि भूमापन क्रमांकाचे पोटविभाग) नियम १९६९ मधील नियम ११ (३) अन्वये भूमापन क्रमांकाचे सामिलीकरणाबाबत आदेश दिल्यामुळे.
११. नागरी भागातील नियोजित विकासासाठी नगररचना विभागाकडून भूमिअभिलेख दुरुस्तीसाठी प्राप्त झालेल्या मंजूर नगररचना योजनेमुळे.
१२. पाटस्थळ जमीनीबाबत, ज्या पाटाचे पाणी जमिनीस मिळते ते पाट नैसर्गिक परिस्थितीमुळे बंद पडल्यामुळे कमी केलेल्या पाणी आकाराच्याकामी काढलेल्या आदेशान्वये.
१३. भूमापन क्रमांकाचे सध्याच्या सत्ताप्रकारामध्ये बदल करुन सदरच्या जमिनी वेगळया सत्ता प्रकारावर देण्याबाबतच्या आदेशामुळे.
वर नमूद केलेल्या प्रकरणांपैकी अनुक्रमांक १ ते ३, आणि ५ ते ९ ह्या प्रकरणी सर्व साधारणपणे भूमीअभिलेख विभागाकडून दुरुस्तीनूसार मोजणी होऊन नंतरच आदेश पारित केले जातात.
अनुक्रमांक ४ ते ५ च्या प्रकरणात मंडल निरीक्षक यांनी जागेची पाहणी करून दिलेल्या सीमांकन अहवालानूसार आदेश काढले जातात व प्रकरण मोजणी करुन भूमापन अभिलेख दुरुस्तीचे बाबत आदेश दिले जातात. अशा प्रकरणी भूमीअभिलेख विभागाकडून केलेल्या मोजणीप्रमाणे येणारे क्षेत्र व आदेशात नमूद केलेले क्षेत्र ह्यामध्ये फरक आढळून आल्यास त्यानूसार भूमीअभिलेख विभागाच्या मोजणीनूसार आलेले क्षेत्रफळ कायम धरुन त्यानूसार दुरुस्ती आदेश पारीत केले जातात.
अनुक्रमांक ११ च्या प्रकरणात नगररचना विभागाने केलेल्या जागेवरील अंतिम प्लॉटची सीमांकनाप्रमाणे मोजणी भूमीअभिलेख विभागाकडून केले जाते व भूमीअभिलेख विभागाने केलेल्या मोजणीप्रमाणे येणारे क्षेत्रफळ कायम धरुन नगर रचना योजनेस अंतिम मंजूरी देणेत येते व त्यानंतर सदरचे योजनेचे कागद 'बी' फॉर्म व भूमि अभिलेखात अंमल देण्यासाठी उप अधीक्षक, भूमिअभिलेख यांचेकडे पाठविले जातात
उपरोक्त अनुक्रमांक १ ते १३ प्रकारचे प्रकरणी सक्षम अधिका-यांनी दिलेल्या आदेशानूसार जर गावच्या भूमापन क्रमांकाचे हद्दीत क्षेत्रफळ अगर आकारात काही फेरबदल होत असेल तर अशी प्रकरणे सक्षम अधिकारी जिल्हा भूमापन कार्यालयातील भूमापन अभिलेख, जमाबंदी अभिलेख, गावचा नकाशा इत्यादी अभिलेखात दुरुस्ती करून गावचा आकारबंद, तेरीज व गावचा नकाशा यात दुरुस्ती करण्यासाठी दुरुस्तीचे पत्रक म्हणजेच कमी जास्त पत्रक तयार उप अधीक्षक, भूमिअभिलेख यांचेकडे पाठवितात.
कोणत्याही कारणास्तव गाव नमुना नंबर १ किंवा आकारबंदच्या गोषवाऱ्यातील क्षेत्र व आकार यामध्ये करण्यात येणारा बदल फक्त आणि फक्त क.जा.प.च्या माध्यमातूनच केला जातो.
उप अधीक्षक, भूमिअभिलेख, भूमि अभिलेख कार्यालयातील भूमापन अभिलेखात, नकाशात व आकारबंदाला नोंद घेऊन क.जा.प.ची एक प्रत उप अधीक्षक भूमि अभिलेख यांच्या स्वाक्षरीने तहसिलदार यांच्याकडे नकाशासह, हक्क नोंदणी व गाव नमुना १ मध्ये नोंद घेण्यासाठी पाठविली जाते.
Ü कमी-जास्त पत्रक कसे असते?:
कमी जास्त पत्रकामध्ये १ ते ८ आणि १ ते १५ स्तंभांचे दोन भाग असतात. त्यातील भाग १ मध्ये स्तंभ क्रमांक १ ते ८ मध्ये दुरूस्ती पूर्वीची स्थिती भाग २ मध्ये स्तंभ क्रमांक १ ते १५ मध्ये दुरूस्ती नंतरची स्थिती दर्शविलेली असते. त्यानुसार सात-बारा सदरी असलेल्या मूळ क्षेत्रात बदल केला जातो.
कमी-जास्त पत्रक छापील नमुन्यात दोन प्रतीत तयार करुन व मंजूर करुन एक प्रत तालूका भूमापन कार्यालयातील आकारबंदाच्या कमी जास्त पत्रकाच्या फाईलीत सामील केली जाते व एक प्रत ग्राम नकाशाच्या करणापुरत्या ट्रेसिंगसह गाव दप्तरी अधिकार अभिलेखात अंमल घेण्यासाठी तहसीलदार यांचेमार्फत तलाठी यांना गावाच्या फेरफार नोंदवहीत नोंद घेणेकामी पाठविले जाते. जर दुरुस्त करावयाचा भूमापन क्रमांक, नगर भूमापनाचे काम पूर्ण झालेल्या नगर भूमापन हद्दीत असेल तर नगर भूमापन कार्यालयाचे कामासाठी कमी जास्त पत्रकाची एक जादा प्रत (तिसरी प्रत) तयार करुन ती नगर भूमापन कार्यालयाकडे पाठविण्यात येते.
सन १९६९ पूर्वी कमी जास्त पत्रक मंजूरीचे अधिकार अधिक्षक भूमि अभिलेख यांना होते. तथापि शासनाचे अभ्यासगटाचे शिफारसीनूसार सन १९६९पासून कमी जास्त पत्रक तयार करुन मंजूर करण्याचे अधिकार उप अधिक्षक, भूमि अभिलेख यांना प्रदान करण्यात आले आहेत.
सक्षम प्राधिकाऱ्याने अशी नोंद प्रमाणित करायची असते. काही ठिकाणी उप अधीक्षक, भूमिअभिलेख असे फेरफार प्रमाणीत करतात. प्रमाणित नोंदीनुसार याचा अंमल ७/१२ सदरी तसेच गाव नमुना नंबर एक सदरी आणि क.जा.प. मुळे उपविभाग निर्माण झाला असल्यास गाव नमुना नंबर सहा-ड सदरी घ्यायचा असतो.
उप अधिक्षक, भूमि अभिलेख कार्यालयात 'अ' अभिलेखात व 'ब' अभिलेखात दुरुस्ती नकाशे ठेवलेले असतात. दुरुस्तीनूसार तयार केलेल्या मोजणी आलेखानूसार गावच्या भूमापन क्रमांकाच्या हद्दीत झालेली दुरुस्ती तांबड्या शाईने करुन गाव नकाशा दुरुस्तीप्रमाणे अद्यावत केला जातो. तसेच 'ब' दप्तरातील दुरुस्ती नकाशा, कमी जास्त पत्रकाप्रमाणे दुरुस्त केलेल्या हद्दी काळ्या शाईने दुरुस्त करतात. ज्यावेळी नकाशात २५% दुरुस्त्या केल्या जातात अगर सदर नकाशाच्या प्रतीचा साठा संपतो तेव्हा सदरची व दप्तरातील नकाशा फोटो झिंको मुद्रणालयाकडे छपाईसाठी पाठविण्यात येतात.
गावचा नकाशा व दुरुस्त करणेसाठी कमी जास्त पत्रकाप्रमाणे केलेली दुरुस्ती तांबड्या शाईने नकाशा ट्रेसिंगमध्ये दाखवून सदरचा दुरुस्त नकाशा ट्रेसिंग, कमी जास्त पत्रकासोबत गावी पाठविण्यात येते.
गावची तेरीज व दुरुस्त नकाशा ट्रेसिंग यावर उप अधिक्षक, भूमि अभिलेख मंजूरीची स्वाक्षरी करुन गावी दुरुस्तीसाठी पाठवितात.
कमी जास्त पत्रकासोबत असलेल्या ट्रेसिंगनूसार गावाच्या नकाशात दुरुस्ती करावी आणि कमी-जास्त पत्रक, ट्रेसिंगसह गावाच्या अभिलेखास जोडावे.
Ü कमी-जास्त पत्रकाचा गाव दप्तरी अंमल कसा द्यावा?:
गाव दप्तरी कमी जास्त पत्रकाचा अंमल देतांना गाव नमुना सात च्या मूळ क्षेत्रात आणि आकारणीत क.जा.प. मध्ये नमूद केल्याप्रमाणे बदल करणे अपेक्षीत आहे. तसेच संपादित क्षेत्राची नोंद गाव नमुना सातच्या कब्जेदार सदरी संपादन यंत्रणेचे नाव व संपादित क्षेत्र व संबंधीत फेरफार क्रमांक लिहावा. अनेक वेळा गाव नमुना सातच्या मूळ क्षेत्रात क.जा.प. मध्ये नमूद केल्याप्रमाणे मूळ क्षेत्रात आणि आकारणीत बदल न करता फक्त इतर हक्कात संपादन यंत्रणेचे नाव व संपादनाचा शेरा लिहिला जातो. ही बाब चुकीची आहे.
क.जा.प. प्रमाणे मूळ क्षेत्र कमी न केल्यामुळे जमिनीच्या मालकी सदरी असणारी व्यक्ती संपादन क्षेत्रासह जमिनीचा विक्री व्यवहार करते व भविष्यात कायदेशीर अडचणी निर्माण होतात. तसेच क.जा.प. प्रमाणे आकारणीची रक्कम कमी न केल्यास, जास्त पैसे वसूल होऊन जमाबंदीत वसुलीचा मेळ बसत नाही. कायदा जाणणार्या एखाद्या व्यक्तीने जास्त रक्कम वसूल केल्यामुळे ती रक्कम परत मिळणेकामी न्यायालयात दाद मागीतल्यास अडचणीत भर पडते.
गाव दप्तरी कमी जास्त पत्रकाचा अंमल कसा द्यावा हे खालील उदाहरणासह समजून घेऊ.
उदाहरण:
गावी आबाजी पुंडलीक कापसे या खातेदाराच्या नावे भूमापन क्रमांक १५१ असून त्यात लागवडी लायक क्षेत्र १४.८१ हे. आर अधिक ०.११ आर पोट खराबा असे एकूण क्षेत्र १४.९२ हे. आर असून आकारणी रु.७२.३१ पैसे अशी आहे. तर त्याचे नावे गाव नमुना सात खालील प्रमाणे असेल.
उपरोक्त आबाजी पुंडलीक कापसे या खातेदाराचे १.१६ हे.आर क्षेत्र कॅनॉलसाठी संपादित करण्यात आले. सदर संपादनाचा क.जा.प. खालील प्रमाणे तयार होईल.
उपरोक्त क.जा.प. चा अर्थ असा की, आबाजी पुंडलीक कापसे या खातेदाराचे लागवडीलायक क्षेत्र १४.९२ हे.आर + पोट खराबा ०.११ आर असे एकूण क्षेत्र १४.९२ हे.आर व आकार ७२.३१ रु. पै. असे होते.
उपरोक्त क.जा.प. नुसार असे दिसून येते की, संपादन यंत्रणेने आबाजी कापसे याच्या लागवडीलायक क्षेत्रातून १.१४ हे. आर + पोट खराब क्षेत्रातून ०.०२ आर असे एकूण १.१६ हे. आर. क्षेत्र कॅनॉलसाठी संपादन केले आहे.
त्यामुळे आबाजी पुंडलीक कापसे या खातेदाराच्या नावे गाव नमुना सात सदरी लागवडीलायक क्षेत्र १३.६७ हे.आर + पोट खराबा १.१६ (संपादित क्षेत्र) +०.९ आर (आधीचा उर्वरीत पो.ख.) एकूण पोट खराबा १.२५ हे. आर तसेच आधीचा आकार ७२.३१ रु. पै. वजा ०५.५७ रु.पै. (संपादनामुळे कमी झालेला आकार) एकूण आकार ६६.७४ रु. पै. असा बदल होईल.
त्याचा गाव नमुना सात खालील प्रमाणे तयार होईल.
क.जा.प. अन्वये झालेल्या फेरबदलाचा अंमल गाव नमुना एक सदरी देणे आवश्यक आहे.
गाव नमुना एक हा महसुली लेख्यांचे आरंभ स्थान आहे.
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १०२ अन्वये जमाबंदी लागू केल्याबरोबर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम ९४(३) मधील सूचनेनुसार भूमी अभिलेख विभागातर्फे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम ८४ अन्वये भूमापन क्रमांक आणि त्याचे उपविभाग यानुसार क्षेत्र व आकारणी याचे विवरणपत्र तयार केले जाते. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम ९२ अन्वये महसुली भूमापन झाले नसले तरीही जमाबंदी लागू करता येते. याच विवरणपत्राच्या आधारे गाव नमुना एक तयार केला जातो. यात एकूण अकरा स्तंभ आहेत.
गाव नमुना एक च्या स्तंभ ९ मध्ये जमिनीत काही फेरबदल करण्यात आला असेल तर त्याचा तपशील नमूद करण्यात येतो व स्तंभ १० मध्ये उपरोक्त प्रमाणे झालेला फेरबदल कोणत्या आदेशाने झाला आहे त्याचा आदेश क्रमांक सविस्तर नमूद करण्यात येतो. या बदलांची नोंद गाव नमुना एकचा गोषवारा मध्येही घेणे आवश्यक असते.
जर एखाद्या भूमापन क्रमांकात क.जा.प. नुसार पोट विभाग/पोट हिस्सा निर्माण करण्यात आला असेल तर त्याबाबत क.जा.प. च्या (दोन्ही भागातील) स्तंभ क्रमांक तीन मध्ये नमूद करण्यात येते. त्यानुसार गाव नमुना नंबर सहा-ड सदरी नोंद घेण्यात येते व स्वतंत्र सात-बारा तयार करण्यात येतो. अन्य कोणत्याही प्रकारे एका भूमापन क्रमांकाच्या पोट हिश्शाचा स्वतंत्र सात-बारा तयार होत नाही.


0 Comments